शिर्डी Raghav Chadha Shirdi : आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील नेते आणि खासदार राघव चढ्ढा याचं गेल्या सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत लग्न झालं. तेव्हापासून या दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं आहे. लग्नाआधीही हे दोघं बराच काळ सोबत होते. याआधी या दोघांना अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात एकत्र दर्शन घेताना पाहण्यात आलंय.
राघव चढ्ढा शिर्डीला आले : खासदार राघव चढ्ढा हे नुकतेच शिर्डीला आले होते. ते साईबाबांचे मोठे भक्त आहेत. त्यामुळे ते अनेकदा शिर्डीला येतात. राघव चढ्ढा यांनी रविवारी (१७ डिसेंबर) साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईंची आरती देखील केली. "साईबाबा मला सतत बोलावत असतात. ते जेव्हा-जेव्हा बोलावतात, तेव्हा-तेव्हा मी साईदरबारी येतो", असं राघव चढ्ढा यांनी येथे बोलताना सांगितलं.
पत्नी परिणीती चोप्रा दिसली नाही : मात्र यावेळी राघव चढ्ढा यांच्यासोबत त्यांची पत्नी परिणीती चोप्रा दिसली नाही. चढ्ढा एकटेच साईंच्या दर्शनाला आले होते. याबाबत त्यांना छेडलं असता, मी लवकरच पत्नी परिणीतीसोबत साईदरबारी येईल, असं उत्तर त्यांनी दिलं. साईबाबा प्रत्येक व्यक्तीला सुखी आणि समाधानी ठेवतात, असंही ते यावेळी म्हणाले.
देशात सुरक्षेचा प्रश्न गंभीर : १३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली. दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली. यावेळी दोघाजणांना संसदेबाहेर घोषणाबाजी करताना ताब्यात घेण्यात आलं. यावर खासदार राघव चढ्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "देशात सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. देशात संसदेची इमारत सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र तिच इमारत जर सुरक्षित नसेल तर देश कसा सुरक्षित राहील", असा आरोप त्यांनी केला.
झालेल्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे : राघव चढ्ढा पुढे बोलताना म्हणाले की, "संसदेत घुसलेला व्यक्ती जर विरोधी पक्षाचा असता तर त्याला UAPA चे कलमं लावून आंतकवादी घोषित केलं गेलं असतं. मात्र त्यांना सत्ताधारी पक्षाच्या खासदारानं पास दिली असल्यानं त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. याची चौकशी होणं अपेक्षित आहे. झालेल्या प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे", असं राघव चढ्ढा म्हणाले.
हे वाचलंत का :