अहमदनगर - जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम गावात वास्तव्यास असलेल्या एका महिलेने तंत्रज्ञानाची कास धरत आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. अकोले तालुक्यातील आंबेवंगण येथील शांताबाई धांडे यांनी पारंपरिक भात पिकाच्या उत्पादनात दुपटीने वाढ घडवून आणली आहे.
भात शेती होती संकटात -
अकोले तालुक्याच्या आदीवासी भागातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पीक आहे. या पीकावरच आदिवासी बांधवांचा चरितार्थाचे चालतो. पूर्वी पारंपरिक पद्धतीने भात पिकाची लागवड केली जात असे. त्यात मोठ्या प्रमाणावर बियाणे, मजूर, रासायनिक खते आणि औषधांचा खर्च होत असे. त्यामुळे भात शेती खूप खर्चिक आणि उत्पन्नाच्या बाबतीत तोट्याची होत चालली होती. या पद्धतीने एकरी सरासरी १० ते १२ क्विंटल उत्पन्न मिळत असे. जमीनही रासायनिक खतांच्या अती वापरणे खराब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शांताबाईंनी शेतीसाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला. अशिक्षित असूनही त्यांनी भात उत्पादन कसे वाढेल याची माहिती घेण्यास सुरुवात केली.
भात शेतीत केले प्रयोग -
आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असलेल्या 'बायफ' या संस्थेबरोबर शांताबाई धांडे यांनी काम सुरू केले. संस्थेच्या तज्ञांकडून भात लागवडीच्या विविध पद्धती त्यांनी शिकूण घेतल्या. भात शेतीत चतु:सूत्री, एस आर टी, एस आर आय या सुधारित लागवड पद्धतींचा अवलंब करत त्यांनी भात शेती फायद्याची केली. शेतीत केलेले बदल भात उत्पादन दुपटीने वाढवत आहेत. हे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बायफमार्फत सुरू केलेल्या आदिवासी महिलांचे स्वयंसहायता समूहांच्या मदतीने भात लागवडीचे हे तंत्रज्ञान गावोगावी नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अभ्यास सहली, शेतकऱ्यांच्या भेटी, गटचर्चा, महिला मेळावे, शेतकरी मेळावे, पीक प्रात्यक्षिके यांच्या माध्यमाने त्यांनी भात लागवडीच्या या तीनही तंत्रज्ञानाचा आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आहे.
उत्पादनात झाली वाढ -
धांडे मावशींनी आपल्या शेतात संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने लागवड केली. त्यांनी सर्वप्रथम आपल्या घराच्या अंगणात गांडूळ खत निर्मिती सुरू केली. त्यानंतर चतु:सूत्री पद्धतीचा अवलंब करून भात लागवडीला सुरुवात केली. यासाठी बायफच्या कृषी तज्ञांनी त्यांना मदत केली. चतु:सूत्री पद्धतीने प्रथमच या भागांमध्ये भात लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि वर्ष 2020 मध्ये सुमारे 33 टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. यानुसार त्यांनी त्यांच्या संपूर्ण भात शेतीमध्ये बदल घडवून आणला असल्याचे शांताबाईंनी सांगितले.
शेतकऱ्यांना करतात मार्गदर्शन -
चतु:सूत्री भात लागवडी सोबतच, जी जंगलांना लागून आणि पाणी न थांबणारी भात खाचरे आहेत. त्यामध्ये एस आर टी आणि एस आर आय या सुधारित भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांनी केला. त्यातूनही उत्पन्नात दुपटीने वाढ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या विशेष कार्याने आणि शेती तंत्रज्ञानाच्या प्रसाराने परिसरातील गरीब आदिवासी शेतकऱ्यांचे भात उत्पादन दुपटीने वाढण्यास मदत झाली आहे. धांडे मावशी स्वतः इंद्रायणी, फुले समृद्धी जिरवेल, आंबेमोहर, काळा भात इत्यादी सुवासिक वाणांची लागवड करतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. त्यांचे भात लागवडीचे प्रयोग बघण्यासाठी दूरवरून शेतकरी येतात. यामध्ये जव्हार, वाडा, विक्रमगड, डहाणू, जुन्नर, आंबेगाव, पेठ, सुरगाणा, हरसुल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी इत्यादी तालुक्यांचा समावेश होतो. त्यांना कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडूनही तांत्रिक मार्गदर्शन व मदत मिळाली आहे.