शिर्डी : शिर्डी विमानतळाच्या भोवताली अद्यावत शहराची उभारणी होणार आहे. त्यामुळे येथील परिसराची भरभराट होणार आहे. दुष्काळी असलेला काकडी अर्थात शिर्डी विमानतळाचा परिसर आधुनिक सुविधायुक्त करणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील बैठकीत केले आहे.
विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसवण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. बुधवारी (29 सप्टेंबर) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मानस व्यक्त केला आहे. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच "आशा" असे या विकसित भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.
ग्रामस्थांकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे काकडी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. दुष्काळी भागासाठी हा प्रकल्प नवसंजीवनी देणार असल्याचे ग्रामस्थ कानिफ गुंजाळ यांनी म्हणटले आहे. मुख्यमंत्री यांच्या निर्णयाचे सर्व ग्रामस्थ स्वागत करत आहेत. निर्णयाची अंमलबजावनी लवकरात लवकर व्हावी. विमानतळासाठी काकडी गावातील १५०० एकर जमीन भुसंपादीत झाली आहे. अगदी कमी मोबदल्यात विमानतळाच्या कामासाठी ही जमीन दिली गेली. आधुनिक शहर निर्माण होताना स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा. काकडी गावच्या समस्या सोडवण्यासाठी देखील राज्य शासनाकडून प्रयत्न व्हावेत, अशा मागण्या ग्रामस्थांकडून करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्वाची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रतिपादन