अहमदनगर - महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराची ओळख आहे. या शिखरावर बीड जिल्ह्यातील शिवाजी भागवत महागोविंद या ध्येयवेड्या तरुणाने सायकलवर 350 किमी प्रवास करत आज स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकाविला आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील रहिवासी असलेला गिर्यारोहक शिवाजीने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर 8 मे रोजी तिरंगा फडकविला होता. त्यानंतर त्याने स्वातंत्र्य दिनाला कळसुबाई शिखरावर तिरंगा फडकवण्याचा निर्धार केला. 12 ऑगस्टपासून सलग 3 दिवस 350 किलोमीटर सायकलने प्रवास करून त्याने कळसुबाई शिखर गाठले. आणि आज गुरुवारी स्वातंत्र्यदिनी पहाटे साडेपाचला शिखर चढण्यास सुरुवात केली. यानंतर अवघ्या दिड तासात त्याने शिखर सर केले व तेथील मंदिरावर तिरंगा व भगवा झेंडा फडकविला. यावेळी शिवाजीचा उर अभिमानाने भरून आला होता. शिखरावरुन परतल्यावर पायथ्याशी असलेल्या जहागीरवाडी येथे रुपाली बाळू घोडे या मुलीने रक्षाबंधननिमित्त राखी बांधून शिवाजीचे स्वागत केले. दरम्यान, शिवाजीच्या या धाडसी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.