अहमदनगर (शिर्डी): महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल रात्री शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर नाशिककडे जाताना अमित ठाकरे यांची गाडी सिन्नर येथील टोल नाक्यावर अडवल्याचा प्रकार घडलाय. त्यानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाकाच फोडलाय. घडलेल्या घटने बाबत अमित ठाकरे यांनी शिर्डीत खुलासा केला आहे.
काय म्हणाले अमित ठाकरे? अमित ठाकरे यांचा काल आणि आज शिर्डी महासंपर्क अभियानाचा दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान अमित ठाकरे यांनी काल रात्री शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर वैयक्तिक कामानिमित्त ते समृद्धी महामार्गाने नाशिकला निघाले होते. याबाबत अमित ठाकरेंनी सांगितले की, सिन्नर टोलनाक्यावर फास्टटॅगमधून टोल कट न झाल्याने दहा ते पंधरा मिनिटे टोल कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली. आम्ही त्यांना तांत्रिक अडचणीविषयी सांगितले; मात्र कर्मचारी उद्धट भाषा वापरत होते. माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, गाडीत अमित ठाकरे आहेत. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकाला देखील फोन लावला. मात्र व्यवस्थापक देखील उद्धट भाषा वापरत होता. टोलनाका कर्मचाऱ्यांनी पंधरा ते वीस मिनिट गाडी थांबवून ठेवली. ही बाब सिन्नर येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी टोल नाका फोडला.
'या' कारणाने टोलनाका फोडला: मी नाशिकला पोहोचल्यावर कळलं की कार्यकर्त्यांनी टोल फोडला, असे अमित ठाकरे यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. आता पर्यंत राज साहेबांमुळे 65 टोल बंद झाले आणि माझ्यामुळे त्यात आणखी एकाची भर पडली. टोल कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरल्यामुळे कार्यकर्त्यांनी टोल फोडला असे स्पष्टिकरण अमित ठाकरे यांनी आज शिर्डीत दिले.
राज ठाकरेंनी केले होते आंदोलन: काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील टोल नाक्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले होते. प्रदीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी टोलनाके फोडण्याचे प्रकार घडले होते. तसेच त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील तब्बल सत्तरहून अधिक टोलनाके बंद करण्याचे आदेश दिले होते. मनसे कार्यकर्ते त्यांच्या आक्रमकतेमुळे नेहमीच चर्चेत राहतात.
हेही वाचा: