अहमदनगर - मामाच्या घरी आलेला तरुण कोरोनाबाधित निघाल्याने गावातील 8 नागरिकांना क्वारंन्टाईन करण्यात आले. त्यामुळे गोधेगावचे सरपंच अशोक भाकरे यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नवविवाहितांनी आगामी दोन वर्ष मूल जन्माला न घालण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनामुळे गावातील नवविवाहितांनी दोन वर्ष मूल जन्माला न घालण्याचे ठरवले आहे.
राहाता तालुक्यातील ममदापूर येथील तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या तरुणाचा थेट संपर्क गोधेगाव येथील त्याच्या मामाच्या कुटुंबाशी आला. त्यामुळे एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती संस्थात्मक क्वारंन्टाईन करण्यात आले आहेत. त्यामुळे
सरपंचानी बैठक बोलावली. या बैठकीत विविध सूचना दिल्या. त्याचबरोबर गावातील नवविवाहित जोडपे व तरुण जोडप्यांना चालू 2020 आणि 2021 या दोन वर्षात आपल्या गावात आपण एकही अपत्य जन्माला घालू नये असे आवाहन केले. यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहील हे सांगता येणार नाही. त्यामुळे गरोदर महिलांना उपचारापासून तर प्रसूतीपर्यंत खूप काळजी घ्यावी लागेल. यातून मातेला व जन्माला आलेल्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाब लक्षात घेता महिलांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास 60 नवविवाहित तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच गाव असावे. गोधेगावची लोकसंख्या 3 हजाराच्या आसपास आहे. या गावात मागील 2019 या वर्षात व यंदाच्या मे अखेर जवळपास 60 तरुणाचे विवाह झाले आहेत. अर्थातच नवीन विवाह झाला की आपसूकच मुलांना जन्म देण्सासंदर्भात नियोजन सुरु होते.
यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यापासून वैश्विक कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचे लोन थेट ग्रामीण भागातही पसरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक सतर्कता बाळगत आहेत. या संकटकाळात गरोदर मातेला वेळेत उपचार मिळाला नाही, तर मातेच्या व बाळाच्या जीवाला देखील धोका होउ शकतो. मागील आठवड्यात नगर येथील कोरोना बाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आणि दुसऱ्या दिवशीच तिचा मृत्यू झाला अशी वेळ आपल्या गावातील कुणावरच येऊ नये, यासाठी आम्ही गावातील नवविवाहित जोड़प्यानी दोन वर्ष मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतल्याचे नवविवाहितांचे म्हणने आहे.