अहमदनगर - पालकमंत्री राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करत एका युवकाने 3 जणांची प्रत्येकी 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अक्षय शिंदे, असे या युवकाचे नाव असून, जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे.
मी राम शिंदेचा पुतण्या असून, तुम्हाला सरकारी नोकरी लावतो असे सांगत अक्षयने ३ जणांची प्रत्येकी २ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. अक्षय शिंदे हा पालकमंत्री राम शिंदे यांच्या चौंडी गावातील रहिवासी असून, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. मात्र, अखेर पुण्यातून अक्षयला पकडण्यात आले असून, त्याला कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील श्रीकांत आनंद मांढरे, थेटेवाडी येथील आनंद लाला भगत आणि रेहेकुरी येथील जयवंत रामचंद्र गायकवाड यांची फसवणूक झाली आहे. अक्षय शिंदेने 2017-18 या वर्षात सरकारी विभागात नोकरी लावून देतो, मी पालकमंत्री राम शिंदे यांचा पुतण्या आहे, त्यांचे माझे जवळचे संबंध आहेत, असे सांगत या तिघांकडून प्रत्येकी २ लाख रुपय घेतले होते. मात्र, ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यापैकी एकाचेही काम न झाल्याने याचा जाब विचारला असता अक्षयने या लोकांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली. अखेर या सर्वांनी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्षय फरार झाला होता. अक्षय पुण्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिलाली होती. त्यानुसास गुन्हे अन्वेषण शाखेने पुण्यातील मिलिटरी कॅम्प परिसरातून त्याला जिल्हा शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने अटक केली. सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे, पोलीस नाईक विशाल गवांदे, रवींद्र कर्डीले, राहुल सोळुंके, सागर ससाने आदींच्या पथकाने अक्षय शिंदेला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.