अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील ( Corona in Ahmednagar ) टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय जवाहर निवासी विद्यालयातील ( Students of Navodaya School Test Positive for COVID-19 ) अजून 33 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे आता एकूण कोरोना बाधितांची संख्या 52 झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी 16 विद्यार्थी आणि तीन शिक्षक बाधित -
दोन दिवसांपूर्वीच या निवासी विद्यालय येथील तीन शिक्षक आणि 16 विद्यार्थी हे कोरोना बाधित झाले होते. त्यानंतर शाळेमधील जवळपास 430 विद्यार्थ्यांची rt-pcr टेस्ट घेण्यात आली. यामध्ये आता अजून 33 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.
पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू -
या सर्व विद्यार्थ्यांना पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भूषण कुमार रामटेके यांनी सांगितले, की अगोदर आलेली 19 आणि त्यानंतर आता नव्याने 33 विद्यार्थी हे कोरोना बाधित आहेत. या सर्वांना पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आललले असून हे सर्व रुग्ण व्यवस्थित असल्याची माहिती डॉक्टर रामटेके यांनी दिली आहे.
संपर्कातील सर्वांची आरटीपीसीआर चाचणी -
टाकळी ढोकेश्वर इथे केंद्र सरकार संचालित नवोदय जवाहर निवासी विद्यालय असून या ठिकाणी 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी केटरिंग त्याचबरोबर भाजीपाला सेवा देणाऱ्या व्यक्तींकडून विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलेला आहे. याबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे, की या सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक त्याचबरोबर निवासी शाळेची संबंधित असलेले सेवा देणारे केटरिंग, भाजीपाला पुरवठा या सर्वांची त्याचबरोबर संपर्कात आलेल्या व्यक्तींची rt-pcr चाचणी घेतली जात आहे.
जिल्ह्यात कडक निर्बंध लागू -
शासकीय, निमशासकीय, खासगी, व्यावसायीक, औद्योगिक, हाॅटेल, रेस्टाॅरंट, शाॅपिंग माॅल, नाट्यगृहे, सिनेमागृहे, लाॅन्स, मंगल कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, मेळावे यांच्यासह सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमात 'नाे लस, नाे एन्ट्री'चे निर्बंध असल्याचे जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी सांगितले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून तसे शासकीय काढण्यात आले आहेत.