अहमदनगर - रात्रीच्या गस्तीत गांजाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेवून 80 हजार 100 रूपये किमतीचा 500 किलो गांजा जप्त करून दोन आरोपींना गजाआड करण्यात लोणी पोलिसांना यश आले आहे. लोणी पोलिसांची ही कारवाई जिल्हातील मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे.
राहाता तालुक्यातील लोणी येथे लोणी-संगमनेर रोडवर शुक्रवारी पहाटे 4.30 वाजताच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी एका संशयास्पद गाडी चालकाची झडती घेतली. त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. घटनेचा पंचनामा केला असता 80 लक्ष रूपये किमतीचा 510 किलो गांजा मिळून आला असल्याची माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोणी पोलिसांनी गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो पिकअप वाहन (क्र. एम.एच. 25 पी. 1294) यासह सर्व मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालक राहुल बाबासाहेब पवार (वय 32 वर्षे ) रा. खर्डा व दत्ता मारूती चव्हाण (वय 35 वर्षे) या दोन आरोपींना अटक केली आहे. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्यासह पोलीस नाईक दीपक रोकडे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी, सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे, संपत जायभाये, कैलास भिंगारदिवे यांनी कारवाईसाठी परिश्रम घेतले.