अहमदनगर - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना परिसरातील बैलगाडी यार्डात 501 वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. कारखाना कार्यस्थळावर झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा व दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर ,आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, नामदेव कहांडळ, सतीश शेजवळ आदी उपस्थित होते.
ऑक्सिजनची मोठी कमतरता भासली
यावेळी संगमनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, ‘निसर्गाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची मूलभूत जबाबदारी आहे. कोरोना संकटांमध्ये आपल्या सर्वांना ऑक्सिजनची मोठी कमतरता भासली. ही ऑक्सिजन निर्मिती वृक्ष करत असून यापुढे सर्वांनी वृक्षांचे रोपण व संवर्धन केले पाहिजे. प्राण वायू हा अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येकाने तीन वृक्षांचे रोपण करावे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने वृक्षांचे संवर्धन केले जात आहे. ही वृक्षसंवर्धन संस्कृती राज्याला दिशादर्शक ठरली आहे.’
प्रदूषण टाळा, पर्यावरणाचे संवर्धन करा
थोरात कारखान्याच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त 501 वृक्षांचे रोपण करून या परिसरात आणखी हिरवाई निर्माण केली जाणार आहे. ऑक्सिजन प्राण वायू यापुढे प्रत्येकाला अधिक चांगल्या प्रमाणात मिळेल, यासाठी निरोगी शरीराबरोबर चांगले पर्यावरण आवश्यक आहे. म्हणून प्रत्येकाने प्रदूषण टाळा, पर्यावरणाचे संवर्धन करा, कोरोना संकटावर मात करण्यासाठी मास्कचा वापर करा. विनाकारण गर्दी करू नका, कोरोणाचे नियम पाळा, कोरोना हा अद्याप पूर्णपणे गेलेला नसून त्यावर संपूर्ण मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. याचबरोबर निसर्ग जर आपण चांगला राखला तर आपले आयुष्य ही चांगले होईल, असेही त्या म्हणाल्या.