अहमदनगर- समृद्धी महामार्गाने कोपरगाव तालुक्यातील एका शाळेच्या इमारतीचा बळी घेतला आहे. पन्नास वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी चांदेकसारे गावातील हायस्कुलची इमारत आज या महामार्गामुळे जमीनदोस्त झाली आहे. यामुळे ९०० विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत.
समृद्धी महामार्गाने राज्य समृद्ध होणार असले तरी या महामार्गामुळे आज एक पन्नास वर्षे जुनी शाळा उद्ध्वस्त झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भारत सर्व संघाची शाळा ही या महामार्गाची बळी ठरली आहे. शाळेला पंधरा दिवसापूर्वी समृद्धी महामार्गातर्फे न्यायालयाच्या माध्यमातून शाळा खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यावर शाळेच्या संचालकांनी व शिक्षकांनी शाळा पाडण्याअगोदर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ देण्याची कोर्टात मांगणी केली होती. ती मागणी न्यायालयाने नाकारली. परिणामी, आज तहसीलदार आणि पोलीस बंदोबस्तात या शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
गेल्या पन्नास वर्षापासून ज्ञानदानाचे काम करणाऱया या शाळेत आज जवळपास ९०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळेची इमारत पाडल्याने आता त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, शाळे जवळ सध्यास्थितीत अडीच एकर जागा शिल्लक असून एका महिन्याच्या आत तिथे पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे शाळेचे सचिव प्रकाश जाधव यांनी म्हटले आहे.