अहमदनगर - ग्रामविकास विभागाकडून 14 व्या वित्त आयोग निधीतून 45 रुग्णवाहिका जिल्हा परिषदेस कोविड-19 उपाययोजनेसाठी प्राप्त झाल्या आहेत. त्याचे हस्तांतरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अहमदनगर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल आदींची उपस्थिती होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 'ब्रेक दी चेन' अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मोजक्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला.
कोरोना काळात रुग्णसेवेसाठी उपयोग-
चौदाव्या वित्त आयोगाच्यानिधीतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी 45 वाहने घेण्यास परवानगी मिळालेली होती. मात्र जिल्ह्यात ग्रामीण भागात दुसरी लाट झपाट्याने वाढत असताना वाहने घेताना रुग्णवाहिका खरेदी केल्यास त्याचा रुग्णांना मोठा फायदा होईल, या दृष्टिकोनातून रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील जनतेने अधिक काळजी घ्यावी-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागावर मोठा परिणाम होताना दिसत असून यात रुग्ण संख्या वाढत असताना मृत्यूही मोठ्या संख्येने होत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी सांगितले. त्यामुळे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मुख्यमंत्र्याच्या संदेशाचे पालन ग्रामीण भागातील जनतेने करावे असे आवाहन त्यांनी केले. कोणतेही प्राथमिक लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी आणि गावात ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर असेल तेथे रिपोर्ट येईपर्यंत विलगिकरणात राहावे. जेणेकरुन जर कोणी व्यक्ती बाधित असेल तर तिचा संसर्ग इतरांना होणार नाही, असे आवाहन घुले यांनी केले.
हेही वाचा - 'कोरोना' संकटाविरुध्द एकजुटीने लढू; महाराष्ट्र दिनी अजित पवारांचा निर्धार