अहमदनगर - शिर्डीजवळील निमगाव कोर्हाळे येथील भाजी विक्रेत्या महिलेला कोरोना झाल्याचे समजताच तिच्या संसर्गात आलेल्या तिच्या कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईकांना अहमदनगरला हलवण्यात आले होते. या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण 27 व्यक्तींना अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येऊन त्यांचे स्राव घेण्यात आले होते. या 27 पैकी 4 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता निमगाव येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 झाल्याने निमगाव व शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कारोनाबाधित महिलेच्या घरातील मुले पती आणि नात अशा 4 जणांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. या बाधित महिलेची नात शिर्डीत आपल्या आईच्या आईकडे गेल्या काही दिवसापासून राहत होती. आज (शुक्रवार) या 3 वर्षीय लहान मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शिर्डी नगरपंचायतने खबरदारी म्हणून शिर्डीतील तो परिसर सील केला आहे. तसेच शिर्डी व परिसरात सध्या शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आला असून, सर्व दुकाने बंद आहेत.
निमगाव, निघोज, शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या सर्व गावांमध्ये सध्या शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आला असून, सर्व दुकाने बंद आहेत. शिर्डी व परिसरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा असे आहवान शिर्डी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी सतिश दिघे यांनी केले.