शिर्डी (अहमदनगर) - महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पन्नास वर्षाहून कमी वय असलेल्या जवळपास वीस हजार महिला विधवा झाल्या आहेत. या विधवांच्या मदतीसाठी अकोले येथील शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने राज्यातील 190 संस्थांनी एकत्र येत या विधवा महिलांना पाच लाख रुपयांची मदत मिळावी, ही मागणी करत राज्यभरातून एकाच दिवशी चौदाशे मेल मुख्यमंत्र्यांना करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या थैमानात राज्यात किती मृत्यू झाले आहेत, याची माहिती राज्य सरकारच्या अधिकृत वेब पेजवरून अकोले तालुक्यातील शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे हेरंब कुलकर्णी घेत असताना हे भयावह वास्तव समोर आले आहे. राज्यात जवळपास 20 हजार महिलांचे साथीदार त्यांना सोडून परलोकी गेले आहेत. अशा परिस्थितीत या महिलांना मदत व्हावी यासाठी कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना अवाहन केले होते. त्याला राज्यभरातील 190 सामाजिक संस्था पुढे आल्या असून त्याच एक नेटवर्क तयार झाले आहे. त्यांच्या माध्यमातून शासन आणि संस्था एकत्रित मिळून स्त्रिया आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी कसे काम करू शकतात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यभरातून शुक्रवारी एकाच दिवसात मुख्यमंत्र्यांना या विधवा महिलांना पाच लाख रुपयाची मदत मिळावी यासाठी चौदाशे ई-मेल करण्यात आले आहे.
हे ही वाचा -कोल्हापुरातील पंचगंगेत सापडला अमेरिकेत आढळणारा 'ॲलिगेटर' जातीचा मासा
21 ते 50 वयोगटातील झालेले महाराष्ट्रातील कोरोना मृत्यू -
वय 21 ते 30 | 1818 |
वय 31 ते 40 | 5870 |
वय 41 ते 50 | 12, 215 |
एकूण मृत्यू | 19,903 |
प्रश्न 20,000 कुटुंबांचा आहे. यांच्या पुनर्वसनासाठी काही करण्याची गरज आहे. यातील महिला मृत्यू व आर्थिक दृष्ट्या सक्षम वगळले तरी किमान 12 हजार कुटुंबांना तर नक्कीच मदतीची गरज आहे.