अहमदनगर - जिल्ह्यातील साईबाबांच्या शिर्डीमध्ये भरदिवसा एका चोरट्याने दुकानातील गल्ल्यावर हात मारत २० हजार रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. मेट्रो शहरांमध्ये होणाऱया चोरींचे प्रकार आता साईंच्या शिर्डीत देखील येऊन ठेपले आहेत.
शिर्डीतील पालखी रोडवरील कानिफनाथ चौकात भर दुपारी एका भामट्याने शर्ट घेण्याचा बहाणा करत दुकानात शिरला. आणि त्याने दुकान मालकाचे लक्ष विचलित करुन चक्क 20 हजाराच्या गल्ल्यावर मोठ्या शिताफिने आपला हात साफ केला आहे. येथील कानिफनाथ चौकातील रुख्मिणी कलेक्शन या दुकानात ही चोरी झाली आहे. विशेष म्हणजे चोरीचा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दुपारच्या वेळी नोकरांची जेवणाची सुटी झाली होती. त्यामुळे दुकान मालक एकटेच दुकानात होते. यावेळी हा भामटा दुकानात ग्राहक बनून आला. त्याने दुकान मालकांना शर्ट दाखवण्यास सांगितले. त्यांनी देखील ग्राहक समजून शर्ट दाखवण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचवेळी दुकान मालक शर्ट काढण्यासाठी पाठमोरे झाल्याचे पाहून या भामट्याने गल्ला उघडून त्यातून चक्क वीस हजार रुपये रक्कम लंपास केली. तसेच काम फत्ते झाल्यावर ड्रॉवर पुन्हा बंद करुन घेतला.
त्यानंतर शर्ट पसंत नसल्याचा बहाणा करत तेढून काढता पाय घेतला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाला आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे दुकान मालक लोढा यांनी सांगितले आहे. आधीसुद्धा लोढा यांच्या दुकानात चोरी होण्याची ही दुसरी वेळ आहे.