अहमदनगर - एसटी बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात बसमधील 4 ठार प्रवासी तर 16 जण गंभीर जखमी झाले. ही घटना पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज सायंकाळी घडली. अपघातात ठार झालेल्या मृतांची नावे अद्याप समजली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा- माळेगावच्या कुस्तीची दंगल गाजली 'दाजी' 'भावजीं'च्या राजकीय कुस्तीने
जामखेडवरून नगरमार्गे ही बस मुंबईला चालली होती. त्यावेळी नगर शहरातील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपुलावर बसला कंटेनर येऊन धडकून हा अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता, की त्याचा आवाज परिसरात घुमला. अपघातामुळे नगर पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. जिल्हा रुग्णालयात स्थानिक माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी भेट देत पाहणी केली. जखमींपैकी ११ जणांनी जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. त्यातील काही रुग्णांना उपचार करून सोडून देण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब गाडे यांनी दिली.
खासगी रुग्णालयात दाखल झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. त्यामुळे जखमींचा आकडा हा १८ ते २२ असल्याचे सांगितले जात आहे. काही प्रवासी गंभीर जखमी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
रुग्णालयातील जखमींची नावे पुढील प्रमाणे : अकबर जनउद्दीन शेख (रा. शिरूर), शालन महादेव साठे, महादेव दादू साठे (दोघे रा. रोहकत, पुणे), एकनाथ येडे, प्रसाद धनंजय चव्हाण (रा. चांदकासारे, कोपरगाव), शुभम किशोर दगडे (रा. नगर) भरत काकासाहेब काकडे (रा. किनी, बीड), जॉर्ज गायकवाड (रा. नगर), काशिनाथ निवृत्ती पोकळे (रा. आष्टी), राजेंद्र मारुती पवार (वाहक रा. जामखेड), रामचंद्र चौधरी (रा. नगर).