अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातील १८ विद्यार्थी युक्रेन मधील विविध कॉलेज कॅम्पस मध्ये अडकले असून आम्हाला लवकरात लवकर भारतात घेऊन जा अशी विनंती या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडे केली आहे. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मधील विविध विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत.
अहमदनगर मधून डॉक्टर एज्युकेशन कॅन्सल्टनसीचे सीओ डॉ. महेंद्र झावरे पाटील यांच्या माध्यमातून २६ विद्यार्थी युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांबरोबर संपर्क झाला असून सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे डॉ. झावरे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत डॉक्टर झावरे यांच्याशी संपर्क साधून सर्व विद्यार्थ्यांची यादी मागून घेतली. या संस्थेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील 18 तर इतर काही बाहेरील भागातील आहेत. असे 26 विद्यार्थ्यांची यादी असून या यादीमधील विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. राज्यातील पुणे, नाशिक आदी जिल्ह्यातील काही विद्यार्थी अडकलेले असून राज्यातील जवळपास 40 विद्यार्थी असल्याची माहिती डॉ. झावरे यांनी दिली.
परराष्ट्र मंत्रालयाला दिली माहिती -
भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेन मधील भारतीय दुतावास मधील अधिकाऱ्यांना २६ विद्यार्थ्यांची नावे पाठवली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. डॉक्टर झावरे यांच्यासह अजून काही माध्यमांद्वारे युक्रेनमध्ये विद्यार्थी गेले आहेत का याबाबतही जिल्हा प्रशासन माहिती घेत आहे. 26 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये अहमदनगर जिल्हाबाहेरील काही विद्यार्थी आहेत. आम्ही विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात आहोत. थोड्यावेळापूर्वीच आमचे त्यांच्याशी बोलणे झाले. वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. युक्रेनमध्ये चार विद्यापीठे आहेत. जिथे अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारतीय दुतावासाने विद्यार्थांशी वेळोवेळी संपर्क केला आहे. विद्यार्थ्यांना भारतीय दुतावासाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास आम्ही सांगितले आहे. भारतीय दुतावास वेळोवेळी मदत करत आहे, असे डॉ. झावरे पाटील यांनी सांगितले.