टोकियो - पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक जिंकून दिले. महिला एकेरीत सिंधूने कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात सिंधूने चीनच्या बिंग जिआओ हिला 21-13, 21-15 असे नमवलं. दरम्यान, पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत चीनच्या ताय झू यिंगकडून पराभव पत्कारावा लागला होता. यामुळे तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले होते. सिंधूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
पी. व्ही. सिंधूने पहिल्या सेटमध्ये 4-2 अशी आघाडी घेतली. तेव्हा चीनच्या बिंग जिआओ हिने शानदार वापसी केली. तिने 6-6 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिंधू 8-6 ने पुढे गेली. पुढे देखील सिंधूची आघाडी कायम राहिली. एकवेळ सिंधू 11-8 ने आघाडीवर होती. त्यानंतर तिने हाच धडाका कायम ठेवत पहिला सेट 23 मिनिटात 21-13 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये देखील सिंधू आक्रमक खेळत होती. तिने 5-3 ने आघाडी घेतली. तेव्हा बिंग जिआओ हिने जोरदार पुनरागमन करत सामना 6-8 अशा स्थितीत आणला. बिंग देखील तोडीसतोड खेळ करत होती. तेव्हा सिंधूने बिंगच्या खेळाला चोख प्रत्युत्तर देत सामना 10-8 अशा स्थितीत आणला. या सेटमध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांना कडवी झुंज देत होते. पण अखेर यात सिंधूने बाजी मारली. सिंधूने हा सेट 21-15 असा जिंकत सामन्यासह कांस्य पदक आपल्या नावे केला.
भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील तिसरे पदक
भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून भारताचे पदकाचे खाते उघडले होते. यात सिंधूने कांस्य पदकाच्या रुपाने भर घातली. आता भारताच्या नावे एक रौप्य आणि एक कांस्य पदक आहे. याशिवाय भारतीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने एक पदक निश्चित केलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूची कामगिरी -
रिओ ऑलिम्पिकधील रौप्य पदक विजेता पी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिला सामना इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा हिच्याशी झाला. या सामन्यात सिंधूने 21-7, 21-10 अशी बाजी मारली.
ग्रुप जे मध्ये दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर हाँगकाँगच्या च्युंग एनगान हिचे आव्हान होते. सिंधूने च्युंगचे आव्हान 21-9, 2-16 असे मोडत तिसरी फेरी गाठली.
तिसऱ्या फेरीत सिंधूचा सामना डेन्मार्कचा मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी झाला. तेव्हा सिंधूने हा सामना अवघ्या 41 मिनिटात 21-15, 21-13 अशा फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची गाठ जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी झाली. या सामन्यात सिंधूने 21-13, 22-20 ने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती.
उपांत्य फेरीत चीनच्या ताय झू यिंगने सिंधूचा पराभव केला. ताय झू यिंगने हा सामना 21-18, 21-12 असा जिंकला.
हेही वाचा - Tokyo olympic : अविश्वसणीय! सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शार्लोट वर्थिंग्टनचा 360 डिग्री बॅकफ्लिप
हेही वाचा - Go For Gold! प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायकांनी दिल्या 'लवलिना बोर्गोहेन'ला अनोख्या शुभेच्छा