पुणे - भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कास्य पदक जिंकले. या विजयानंतर भारतीय हॉकीचा संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, तब्बल 41 वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने जी कामगिरी केली आहे, त्याबद्दलच्या भावना शब्दात मांडता येणार नाहीत, असे म्हटलं आहे.
धनराज पिल्ले भारतीय संघाच्या कामगिरीवर म्हणाले की, तब्बल 41 वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने जी कामगिरी केली आहे, त्याबद्दलच्या भावना शब्दात मांडता येणार नाहीत. सेमीफायनलचा सामना हरल्यानंतर भारतीय खेळाडूंवर मोठा दबाव होता. त्यानंतर कास्य पदकासाठी भारतीय खेळाडूंचा सामना बलाढ्य अशा जर्मनी सोबत होणार होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी जो खेळ दाखवला, तो खुप जिगरबाज खेळ होता. 60 मिनिटात 5 गोल करण्यासाठी खूप मोठी जिगर लागते आणि भारतीय खेळाडूंनी ते करून दाखवलं आणि सामना जिंकला.
भारतीय हॉकीसाठी आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे. तब्बल 41 वर्षाने भारतीय संघ हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून संपूर्ण भारताला खूप मोठं बक्षीस दिलं आहे. भारतीय खेळाडूंच्या या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह सर्वच देशवासीय या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
आजच्या विजयाचा प्रवास केवळ एका दिवसापुरता नव्हता तर या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी या संघाला पाच वर्षाचा कालावधी लागला. बेल्जियम नंतर बलाढ्य जर्मनीसोबत खेळून त्यांना हरवणे सोपे नव्हते आणि भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी यशस्वीरित्या करून दाखवली. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी आज मिळवलेल्या यशाबद्दल शब्दात भावना व्यक्त करता येणार नाहीत, असे देखील पिल्ले यांनी सांगितलं.
भारतीय खेळाडूंनी आज पटकवलेल्या कास्य पदकामुळे भुवनेश्वर मध्ये 2023 मध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्डकप आणि 2024 साली पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा खेळ चांगला होऊ शकतो. टोकियोमध्ये कास्य पदक मिळवणारी भारताची ही टीम पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकते, असा विश्वास देखील धनराज पिल्ले यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय हॉकी स्टार सिमरनजीत सिंगच्या संघर्षाची कहानी
हेही वाचा - Tokyo Olympics : पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर जिंकलं पदक, जर्मनीला नमवत 'कांस्य'वर केला कब्जा