माद्रिद - अलेक्झेंडर ज्वेरेवने मॅटियो बेरेटिनीचा पराभव करीत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ज्वेरेवचे हे दुसरे विजेतेपद आहे. दरम्यान, ही स्पर्धा फ्रेंच ओपनच्या तयारीसाठी महत्वपूर्ण मानली जाते.
अंतिम सामन्यात ज्वेरेवने १०व्या मानांकित बेरटिनीचा ६-७(८), ६-४, ६-३ अशा फरकाने पराभव केला. सहाव्या मानांकित ज्वेरेवने मार्चमध्ये अकापुल्कोमध्ये मेक्सिकन ओपनचे जेतेपद पटकावले होते. त्याने यापूर्वी २०१८ मध्ये थीमचा पराभव करीत प्रथमच माद्रिद ओपनमध्ये जेतेपद पटकावले होते.
विजेतेपद पटकावल्यानंतर ज्वेरेव म्हणाला, 'फ्रेंच ओपनमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला क्ले कोर्टवर शानदार कामगिरी करणे आवश्यक असते. शेवटी मी मास्टर्सचे जेतेपद पटकावले. त्यामुळे माझ्यासाठी हे विजेपद महत्त्वाचे आहे. मी या उपलब्धीमुळे खूश आहे.'
दरम्यान, ज्वेरेवने उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित राफेल नदालचा व उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित डॉमनिक थीमचा पराभव केला होता.
हेही वाचा - जगातील अव्वल टेनिसपटू अश्ले बार्टीचा पराभव करत आर्यनाने पटकावले माद्रिद ओपनचे विजेतेपद
हेही वाचा - माद्रिद ओपन : 'लाल माती'च्या बादशाहला पराभवाचा धक्का, ज्वेरेवची नदालवर मात