नवी दिल्ली - सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने पॅरिस मास्टर्समध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहे. फ्रेंच ओपनचा विजेता राफेल नदाल या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
३३ वर्षीय जोकोविच म्हणाला, ''मी पॅरिसमध्ये खेळणार नाही. पण मी व्हिएन्ना आणि लंडनला जाईल.'' जोकोविचने मागील महिन्यात रोममध्ये इटालियन ओपनचे विजेतेपद जिंकून ३६वा एटीपी मास्टर्सचे विजेतेपद जिंकले होते.
फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावून नदालने रॉजर फेडररच्या २० ग्रँड स्लॅमच्या विजेतेपदांची बरोबरी केली आहे. नदाल २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत व्हिएन्नामध्ये होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणार नाही. परंतु १५ ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या लंडनमध्ये एटीपी फायनल्समध्ये तो भाग घेण्याची शक्यता आहे.