न्यूयॉर्क - भारताच्या सुमित नागल याने यूएस ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. पात्र फेरीच्या अंतिम सामन्यात सुमितने ब्राझीलच्या जाओ मेंगेस याचा ५-७, ६-४, ६-३ असा पराभव केला. सुमित वयाच्या २२ व्या वर्षी कोणतीही ग्रँड स्लॅम स्पर्धेतील मुख्य फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
सुमित नागल हा जागतिक क्रमवारीत १९० व्या क्रमांकावर आहे. यूएस ओपन ही स्पर्धा २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये त्याचा सामना पहिल्या फेरीत दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याच्याशी होईल.
पात्रता फेरीतील सामन्यात सुमित पहिला सेट ५-७ ने गमावला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सुमित १-४ ने पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर सुमितने शानदार पुनरागमन केले. त्याने सलग ५ गेम जिंकत सेट ६-४ असा जिंकला आणि सामना १-१ अशा बरोबरीत रोखला.
सुमित निर्णायक सेट ६-३ ने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश केला. सुमितकडून पराभूत झालेला ब्राझीलचा खेळाडू जाओ मेंगेस हा जागतिक क्रमवारीत २१० क्रमांकावर आहे.