न्यूयॉर्क - अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेमध्ये स्पेनचा खेळाडू राफेल नदाल आणि महिला एकेरी गटात गतविजेतील नाओमी ओसाका हिने दुसरी फेरी गाठली. तसेच या स्पर्धेत सिमोना हॅलेपने, युवा खेळाडू कोरी गॉफ हिनेही पुढील फेरीत आगेकूच केली आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या नदालने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅनला ६-३, ६-२, ६-२ अशा सेटमधये् पराभव केला. नदालचा दुसऱ्या फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाच्या थानसी कोकिनकिस याच्याशी सामना होणार आहे.
तर महिला एकेरी गटामध्ये जपानच्या अग्रमानांकित ओसाकाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. ओसाका विरुध्द रशियाच्या बिगरमानांकित अॅना ब्लिंकोव्हा असा सामना झाला. हा सामना २ तास आणि २८ मिनिटे रंगला होता. मात्र, या लढतीत ओसाकाने रशियाच्या बिगरमानांकित अॅना ब्लिंकोव्हावर ६-४, ६-७ (५-७), ६-२ असा विजय मिळवला. ओसाकाचा दुसऱ्या फेरीत सामना मॅग्डा लिनेटशी होईल.
विम्बल्डन २०१९ विजेती रोमानियाची चौथ्या मानांकित सिमोना हॅलेपने निकोल गिब्सचा ६-३, ३-६, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर अमेरिकेच्या १५ वर्षीय गॉफने अॅनास्तेशिया पोटापोव्हाला दोन तास रंगलेल्या सामन्यात ३-६, ६-२, ६-४ असा पराभव केला.