न्यूयॉर्क - कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदाच्या यूएस ओपनमधून अनेक टेनिसपटू माघार घेत आहेत. याचा फायदा भारताचा आघाडीचा युवा टेनिसपटू सुमित नागलला झाला आहे. सुमितला यूएस ओपनच्या पुरुष एकेरी प्रकारात थेट प्रवेश मिळाला आहे. एटीपीच्या अव्वल १२८ क्रमांकापर्यंतच्या खेळाडूंना या स्पर्धेत प्रवेश मिळाला असून नागलची जागतिक क्रमवारी १२७ अशी आहे. २२ वर्षीय सुमित नागल हा या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवणारा एकमेव भारतीय टेनिसपटू आहे.
गेल्या वर्षी सुमितने २०-वेळा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडररविरूद्ध शानदार कामगिरी बजावली होती. सुमितने फेडररविरूद्ध एक सेटही जिंकला होता. या सामन्यानंतर सुमित लोकांच्या नजरेत आला. ग्रँडस्लॅम एकेरीच्या यादीत नोव्हाक जोकोविच प्रथम क्रमांकावर आहे.
यूएस ओपन ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतून स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल, निक किर्गिओस, आणि महिला खेळाडू एश्ले बार्टी यांनी कोरोनामुळे माघार घेतली आहे. स्वित्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे या स्पर्धेत गैरहजर असेल. यूएस ओपनपूर्वी, २२ ऑगस्टपासून सिनसिनाटी ओपन होणार आहे.