रोम - अव्वल मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने तिचे पहिले इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. महिला गटात झालेल्या अंतिम सामन्यात तिने झेक प्रजासत्ताकच्या गतविजेत्या कॅरोलिना प्लिस्कोवा विरुद्ध विजय साकारला.
हालेपने प्लिस्कोवा विरुद्ध ६-०, २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, प्लिस्कोवाला सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे तिने मैदान सोडले. यानंतर हालेपला विजयी घोषित करण्यात आले. २०१७ आणि २०१८मध्ये हालेप या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाली होती. मात्र, यावर्षी तिने जोरदार लढत देत विजेतेपद पटकावले.
आगामी फ्रेंच ओपनमध्ये हालेपला येत्या रविवारी आपला पहिला सामना खेळायचा आहे. अव्वल खेळाडू एश्ले बार्टीने फ्रेंच ओपनमधून माघार घेतल्यामुळे हालेप महिला एकेरीच्या स्पर्धेत अव्वल मानांकित ठरली आहे.
इटालियन ओपन जिंकल्यानंतर हालेपचे हे २२वे डब्ल्यूटीए आणि क्ले कोर्टवरचे ९वे जेतेपद आहे. हालेप आणि प्लिस्कोवा आत्तापर्यंत १२वेळा आमने सामने आले आहेत. त्यात मागील ४ सामन्यात प्लिस्कोवाने ३ वेळा हालेपवर सरशी साधली आहे.
हा हालेपचा सलग १४वा विजय आहे. कोरोनादरम्यान टेनिस पुन्हा सुरू झाल्यानंतर तिने पराग्वे ओपनचे विजेतेपद जिंकले आहे.