पॅरिस - भारताचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनचे प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याचे स्वप्न मोडले आहे. फ्रेंच ओपनच्या पात्रता स्पर्धेत वाइल्ड कार्डधारक टी लामासाइनकडून रामनाथनला पराभव स्वीकारावा लागला.
लामासाइनने भारताच्या रामनाथनवर ७-५, ६-२ असा विजय मिळवला. रामनाथम जागतिक क्रमवारीत १९८व्या तर, लामासाइन २६८व्या क्रमांकावर आहे. या सामन्यात रामनाथनने ८ पैकी ७ ब्रेकपॉइंट गमावले.
पहिल्या फेरीत रामनाथनची सर्व्हिस दोन वेळा ब्रेक करण्यात आली. देशातील आघाडीचा खेळाडू सुमित नागल आधीच स्पर्धेबाहेर पडला आहे. प्रजनेश गुणेश्वरन हा एकमेव भारतीय टेनिसपटू या स्पर्धेत झुंज देत आहे.
रामनाथन २०१५पासून ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, यात तो अजूनही यशस्वी होऊ शकलेला नाही. भारताची अंकिता रैना महिला एकेरीच्या पात्रता फेरीत सर्बियाच्या जोवाना जोविकचा सामना करेल.