नवी दिल्ली - स्पेनच्या राफेल नदालने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली. उपांत्य सामन्यात त्याने इटलीच्या माटो बर्टिनीला हरवत या स्पर्धेची पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. यंदाच्या यूएस ओपन स्पर्धेचे जेतेपद नदालने पटकावले तर त्याचे हे १९ वे ग्रँडस्लॅम जेतेपद असणार आहे.
हेही वाचा - 'माझ्याकडून ते सर्व घाईघाईत झाले'-
३३ वर्षीय नदालने बर्टिनीला ७-६, ६-४, ६-१ असे पराभूत केले. नदालच्या कारकीर्दीतील ग्रँडस्लॅमचा हा २७ वा अंतिम सामना असणार आहे. अंतिम सामन्यात नदालची लढत रशियाच्या डॅनियल मेदवेदेवशी होईल. मेदवेदेवने उपांत्य सामन्यात बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला ७-६, ६-४, ६-३ ने हरवले आहे.
नदालने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'स्पॅनिश स्टार म्हणाला, पुन्हा एकदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल मी आनंदी आहे. इथेपर्यंत पोहचणे माझ्यासाठी खुप महत्त्वाचे होते. कारण या हंगामाच्या सुरूवातीस खूप त्रास झाला होता, खुप अडचणींना सामोरे जावे लागले होते.'
नदालने हे विजेतेपद पटकावले तर यूएस ओपनचे त्याचे हे चौथे विजेतेपद असणार आहे. स्वित्झर्लंडचा अनुभवी रॉजर फेडररने नदालपेक्षा जास्त ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. फेडररच्या नावावर २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे आहेत.
गेल्या महिन्यात माँट्रियाल ओपनच्या अंतिम सामन्यात त्याने मेदवेदेवचा पराभव केला होता. २३ वर्षीय मेदवेदेवच्या कारकिर्दीतील हा पहिलाच ग्रँडस्लॅम सामना असणार आहे.