रोम - जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोविचने अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनचा सरळ सेटमध्ये पराभव करत इटालियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने श्वार्ट्झमनचा 7-5, 6-3 असा पराभव करून आपले 36वे मास्टर्स जेतेपद जिंकले. या विक्रमात जोकोविच नदालपेक्षा एका विजेतेपदाने पुढे आहे.
श्वार्ट्झमनने जोकोविच आणि नदाल यांच्याखेरीज ही स्पर्धा जिंकलेल्या खेळाडूंच्या यादीत सामील होण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला. विजयानंतर जोकोविच म्हणाला, "हा एक चांगला आणि अतिशय आव्हानात्मक आठवडा होता. या आठवड्यात मी माझा सर्वोत्कृष्ट खेळ केला, असे मला वाटत नाही. परंतू आवश्यकतेनुसार मी माझा सर्वोत्कृष्ट खेळ केला."
"यामुळे मला खूप समाधान मिळाले. मी माझ्या फॉर्मात येऊ शकलो, याचा मला अभिमान आहे. पॅरिसला जाण्यापूर्वी रोमपेक्षा चांगली स्पर्धा माझ्यासाठी होऊ शकली नसती", असेही जोकोविचने सांगितले. जोकोविचने यावर्षी 32 सामने खेळले असून त्यापैकी 31 सामने त्याने आपल्या नावावर केले आहेत.