पॅरिस - जगातील प्रथम क्रमांकाचा पुरुष टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला मागे टाकत फ्रेंच ओपनमध्ये अजून एक विजय नोंदवला आहे. फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचने डॅनियल इलाही गालानचा पराभव करून पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. जोकोविचने गालानवर ६-०, ६-३, ६-२ अशी मात दिली.
फेडररने या स्पर्धेत एकूण ७० विजय मिळवले आहेत. तर, जोकोविचच्या खात्यात ७१ विजय झाले आहेत. दुखापतीमुळे फेडररने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. गालानविरुद्धच्या सामन्यात जोकोविचने या सामन्यात सात वेळा सर्व्हिस ब्रेक करत सात गुण वाचवले. पुढील फेरीत जोकोविचचा सामना कारेन खाचनोवशी होईल. जोकोविच आणि खाचनोव तीन वेळा आमने-सामने आले असून यात तीनही वेळा जोकोविचने बाजी मारली आहे.
महिला एकेरीत गार्बिन मुगुरुझा स्पर्धेबाहेर पडली आहे. तिला डॅनियल कोलिंसने ७-५, २-६, ६-४ असे बाहेर ढकलले. हा सामना दोन तास 28 मिनिटांपर्यंत रंगला होता. ‘लाल मातीवरील बादशाह’ राफेल नदाल तसेच जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि किकी बेर्टेन्स यांनी आपापले सामने सहज जिंकत उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले आहे.