नवी दिल्ली - लॉकडाऊन दरम्यान नवीन काहीतरी शिकण्यावर भर दिला पाहिजे, असे भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने सांगितले आहे. ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये पेसने आपली प्रतिक्रिया दिली.
टेनिसपासून दूर असताना वेळेचा उपयोग कसा करावा या प्रश्नाला उत्तर देताना पेस म्हणाला, “लॉकडाऊन दरम्यान आपण काही नवीन गोष्टी शिकणे महत्वाचे आहे.” वयाच्या 46 व्या वर्षी खेळण्याची कशी प्रेरणी मिळाली या प्रश्नावरही 18 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या पेसने उत्तर दिले. तो म्हणाला, ''टेनिसशी पिढ्यांपासून चालत आलेले माझे नाते खूप खास आहे."
पेसने आर.के. खन्ना आणि अनिल खन्ना यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल दिलखुलास उत्तर दिले. "जेव्हा मी टेनिस खेळू लागलो होतो तेव्हा आर के खन्ना एआयटीएचे अध्यक्ष होते. त्यांच्याशिवाय मी इथेपर्यंत पोहोचू शकलो नसतो. 14-15 वर्षाचा असताना त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी मला आयटीएफमध्ये येण्यास मदत केली. त्यावेळी माझ्या कुटुंबाला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचा खर्च परवडला नसता. त्यानंतर अनिल खन्ना यांनी त्यांच्याकडून पदभार स्वीकारला", असे पेसने सांगितले.