न्यूयॉर्क - माजी अव्वल आणि चार वेळा ग्रँड स्लॅम विजेती महिला टेनिसपटू किम क्लाइस्टर्सने वेस्टर्न आणि साउदर्न ओपन टेनिस स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. किम म्हणाली, "वेस्टर्न अँड साउदर्न ओपन स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. माझ्याकडे सिनसिनाटी ओपनमध्ये खेळण्याच्या खूप आठवणी आहेत. यावर्षी मी या स्पर्धेत भाग घेण्यास तयार होते. पण वैद्यकीय सल्ला मिळाल्यानंतर मला परतण्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे."
किमला या स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड मिळाले आहे. पहिल्या फेरीत ३७ वर्षीय किमचा सामना जेनिफर ब्रॅडीशी होणार होता. यापूर्वी स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानेही दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती.
तीन मुलांची आई असलेल्या किमने याआधी दोनवेळा निवृत्ती स्वीकारली होती. २००३ मध्ये किमने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले होते. तर, २००५ मध्ये तिने आपले पहिले वहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते.
२००७ मध्ये गरोदर असताना तिने निवृत्ती घेतली होती. मात्र दोन वर्षांनी पुनरागमन करत तिने २०१० मध्ये यूएस ओपनला गवसणी घातली. त्यानंतर २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पटकावल्यानंतर तिने परत एकदा निवृत्ती घेतली होती.