नवी दिल्ली - तब्बल आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर प्रथमच टेनिस कोर्टवर धडक मारणार्या महिला टेनिसपटू किम क्लाइस्टर्सला पराभवाचा सामना करावा लागला. दुबई ओपनच्या पहिल्या फेरीत स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाने बेल्जियमच्या किमला ६-२, ७-६ असे नमवले.
हेही वाचा -खुशखबर!...२०२१ ची विश्वकरंडक स्पर्धा होणार भारतात
२०१२ च्या यूएस ओपननंतर किमचा हा पहिला सामना होता. टेनिसविश्वातील अव्वल महिला खेळाडू आणि तीन मुलांची आई असलेल्या किमने याआधी दोनवेळा निवृत्ती स्विकारली होती. २००३ मध्ये किमने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले होते. तर, २००५ मध्ये तिने आपले पहिले वहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते.
२००७ मध्ये गरोदर असताना तिने निवृत्ती घेतली होती. मात्र दोन वर्षांनी पुनरागमन करत तिने २०१० मध्ये यूएस ओपनला गवसणी घातली. त्यानंतर २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पटकावल्यानंतर तिने परत एकदा निवृत्ती घेतली होती.