नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागल यूएस ओपनमधील मुख्य ड्रॉच्या जवळ पोहोचला आहे. नागलने दुसऱ्या पात्रता फेरीत कॅनडाच्या पीटर पोलांस्कीला हरवले.
नागलने पोलांस्कीवर ७-५, ७-६ अशी मात केली. या दोन्ही खेळाडूंमध्ये हा सामना दोन तास आणि पाच मिनिटे रंगला होता. नागलने पहिल्या सेटमध्ये दमदार सुरुवात केली. त्याने सुरुवातीला ३-० ने आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र, पोलांस्कीने २ गुण घेत पुनरागमन केले.
पोलांस्कीने नागलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण, नागलने त्याला वरचढ होऊ दिले नाही. दुसऱ्या सेटमध्येही नागलने आघाडी घेतली. मात्र, पहिल्या सेटप्रमाणेच हा सेटही त्याने खिशात घातला.
जागतिक क्रमावारीत सुमित नागल १९० व्या क्रमांकावर आहे. जर त्याने यूएस ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला तर असे करणारा तो चौथा भारतीय ठरणार आहे. पात्रता फेरीत नागलचा अंतिम सामना ब्राझीलच्या जोआओ मेनेजेसशी होणार आहे.