मुंबई - राफेल नदाल पाठोपाठ आणखी दोन स्टार टेनिसपटूंनी टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. पुढील महिन्याच्या २३ तारखेपासून टोकियो ऑलिम्पिकला सुरूवात होणार आहे. त्याआधीच स्टार खेळाडू स्पर्धेतून माघार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेयाचा टेनिसपटू डोमिनिक थीमने टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याने आपण या स्पर्धेसाठी तयार नाही. सध्या मला विम्बल्डन स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे कारण दिलं आहे. थीमनंतर काही तासांतच कॅनडाचा टेनिसपटू डेनिस शापोवालोवने आपण ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. त्याने, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे ट्विट करत सांगितलं आहे.
नदालची माघार...
स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने टोकियो ऑलिम्पिक आणि विम्बलडनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेनंतर ऑलिम्पिक स्पर्धांसाठी जास्त वेळ नसल्याने फिटनेसचे कारण देत नदालने माघार घेतली. याबाबत त्याने ट्विट करत सांगितलं होतं.
जोकोव्हिच, फेडररचं काय?
नोवाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर या दोघांनी आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार की नाही, याबाबतची कोणतीही घोषणा केलेली नाही. पण जोकोव्हिचने सामन्यासाठी प्रेक्षक उपस्थित असणार असतील तरच सामना खेळणार असल्याचे याआधी सांगितलं आहे. दुसरीकडे फेडररने फिटनेसच्या कारणामुळे फ्रेंच ओपन स्पर्धा मधूनच सोडली होती. त्यामुळे त्याच्या ऑलिम्पिक खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
हेही वाचा - मोठी बातमी, नदालची विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार
हेही वाचा - WTC Final : सेहवागने एका दगडात मारले २ पक्षी मारले, ICCसह टीम इंडियाला धुतलं