नवी दिल्ली - भारतीय महिला टेनिसपटू अंकिता रैनाने थायलंडच्या नोन्थाबुरी येथे झालेल्या आणि २५,००० डॉलर्स बक्षीस असलेल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आयटीएफ एकेरीच्या अंतिम फेरीत अंकिताने क्लो पॅकचा पराभव केला. अंकिताचे हे मोसमातील पहिले आणि दहावे करियर आयटीएफ एकेरीचे जेतेपद आहे.

हेही वाचा - टेबल टेनिस : हरमीत देसाई आणि सुतिर्था मुखर्जी यांना राष्ट्रीय जेतेपद
तिसर्या मानांकित अंकिताने चौथ्या मानांकित फ्रान्सच्या पॅकचा ६-३, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या व्यतिरिक्त अंकिताने नेदरलँडच्या बिबिएन स्कूफ्ससमवेत दुहेरीचे जेतेपदही जिंकले. क्लोईविरूद्ध अंकिताचा हा पहिला विजय आहे. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात अंकिताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
अंकिता रैना ही भारताची अव्वल एकेरी आणि दुहेरीपटू असून तिने दुहेरीत डब्ल्यूटीए चॅलेन्जरचा किताब जिंकला आहे. आयटीएफ महिला सर्किटमध्येही तिने १० एकेरी आणि १६ दुहेरीची जेतेपदे पटकावली आहेत.