पॅरिस - २७ सप्टेंबरपासून येथे सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेत ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेला वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात यूएस ओपनमध्येही मरेला वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाला होता. या स्पर्धेत त्याला दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले.
गेल्या वर्षी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मरेची ही पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. यूएस ओपनच्या पहिल्या फेरीत त्याने जपानच्या यशितो निशियाकोला ४-६, ४-६, ७-६ (७/५), ७-६ (७/४), ६-४ असे हरवले. परंतू दुसऱ्या फेरीत त्याला १५व्या मानांकित कॅनडाच्या फेलिक्स एगुर एलासिमने पराभूत केले.
मरे व्यतिरिक्त इतर सात खेळाडूंना रोलंड गॅरोस स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे. ३३ वर्षीय मरेने तीन वर्षांपूर्वी रोलंड गॅरोस येथे शेवटचा सामना खेळला होता, तेथे उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याला स्टॅन वांवरिंकाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
महिला एकेरी प्रकारात ऑजेनी बोकार्ड आणि त्वेताना पिरोंकोव्हा यांनाही मुख्य ड्रॉमध्ये वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाला आहे. जगातील पहिल्या क्रमांकाची महिला टेनिसपटू ऑस्ट्रेलियाच्या एश्ले बार्टीने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
क्ले कोर्टवर खेळली जाणारी फ्रेंच ओपन स्पर्धा (रोलंड गॅरोस) मे महिन्यात होणार होती. परंतू कोरोना विषाणूच्या साथीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. २७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रोलंड गॅरोस स्पर्धेत प्रेक्षकांना प्रवेश दिला गेला आहे. एका दिवसात फ्रेंच ओपनमध्ये सर्वाधिक प्रेक्षकांची संख्या १५०० अशी आहे.