अम्मान - जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक विजेता भारताचा बॉक्सिंगपटू अमित पांघलने टोकियो ऑलिम्पिकसाठीचा प्रवास निश्चित केला आहे. अमितने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला. ५२ किलो वजनी गटातील या अटीतटीच्या सामन्यात अमितने फिलीपाईन्सच्या कार्लो पालमला ४-१ अशी मात दिली.
हेही वाचा - ६ वर्षाच्या पोरीकडून ब्रेट लीची धुलाई!.. पाहा व्हिडिओ
तत्पूर्वी, भारताची उदयोन्मुख महिला बॉक्सर साक्षी चौधरी ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. साक्षीला दक्षिण कोरियाच्या एजी इमने ०-५ अशी मात दिली. या पराभवामुळे साक्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिकीट मिळविण्यास चुकली आहे.
वयाच्या पंधराव्या वर्षी एआयबीए वर्ल्ड ज्युनिअर महिला स्पर्धेच्या अंतिम फेरीत साक्षीने अमेरिकन नॅशनल चॅम्पियन यारीसेल रमीरेझचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न तिला पूर्ण करता आले नाही.
आशियाई चॅम्पियन पूजा रानी आणि विकास कृष्णन यांनीही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. जॉर्डनच्या अम्मानमध्ये झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात पूजाने तर, ६९ किलो वजनी गटात विकासने ही कामगिरी केली.