नवी दिल्ली - अमेरिकेच्या याँकटन येथे प्रस्तावित जागतिक तिरंदाजी फील्ड चॅम्पियनशिप स्पर्धा कोरोनामुळे 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन सप्टेंबरमध्ये याँकटनमधील एनएफएए तिरंदाजी केंद्रात होणार होते. हे तिरंदाजी सुविधेचे सर्वात मोठे केंद्र आहे.
या केंद्राने जागतिक युवा आणि जागतिक इनडोअर चॅम्पियनशिपचे आयोजन केले आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आणि कोरोनामुळे जारी केलेल्या नियमांचा विचार करून जागतिक तिरंदाजी (डब्ल्यूए) आणि याँकटन आयोजन समितीने हा निर्णय घेतला आहे.
डब्ल्यूएचे महासचिव टॉम डीलेन म्हणाले, "आम्हाला वाटते की फील्ड चॅम्पियनशिपमध्ये बराच विलंब होईल. पण सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे."
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 69 लाख 67 हजार 37 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.