नवी दिल्ली - माजी विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद अखेर शनिवारी भारतात परतला आहे. कोरोनामुळे प्रवासाशी संबंधित निर्बंधामुळे तो तीन महिन्यांहून अधिक काळ जर्मनीमध्ये अडकला होता.
आनंद एअर इंडियाच्या विमानातून फ्रॅंकफर्टहून दिल्लीमार्गे दुपारी सव्वा वाजता बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. आनंद भारतात परतल्यामुळे त्याची पत्नी अरूणाने प्रतिक्रिया दिली. अरुणा म्हणाली, ''हो, आनंद परत आले आहे. ते सुखरूप आहेत. त्यांना भारतात परतल्याचा खूप आनंद आहे''.
कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार आनंदला 14 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. आनंदला काही दिवसांपूर्वी, डब्ल्यूडब्ल्यूएफ (वर्ल्ड वाइड फंड) इंडियाच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा ब्रँड अम्बेसिडर बनवण्यात आले आहे. आनंदसह भारतातील सहा अव्वल बुद्धिबळपटूंनी पंतप्रधान निधीसाठी साडेचार लाखांचा निधी जमा केला आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी आनंदसह सहा भारतीय खेळाडूंनी हा निधी जमावला आहे.