नवी दिल्ली - भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला लेजेंड स्पर्धेत सलग पाचवा पराभव स्वीकारावा लागला आहे. हंगेरीच्या पीटर लेकोने आनंदला 3-2 असे हरवले. माजी विश्वविजेत्या आनंदने बेस्ट ऑफ फोर बेट्सचा पहिला सामना जिंकत चांगली सुरूवात केली होती. मात्र, त्यानंतरचे दोन्ही सामने अनिर्णित राहिले.
त्यानंतर लेकोने विजय मिळवत सामना बरोबरीत आणला. त्यानंतरच्या खेळीत, लेकोने टायब्रेकरमध्ये विजय मिळवत आनंदच्या पदरी पाचवा पराभव सोपवला. आनंद या स्पर्धेत गुणतालिकेत सर्वात खाली आहे.
मॅग्नस कार्लसन टूरमध्ये पहिल्यांदा खेळत असलेल्या आनंदला यापूर्वी पीटर स्वीडलर, मॅग्नस कार्लसन, व्लादिमीर क्रॅमिक आणि अनिश गिरी यांच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. जगातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लसनने अनुभवी वेसिल इव्हानचुकला 3-2 असे हरवले.
दहा खेळाडूंच्या रॉबिन राऊंड लीगनंतर अव्वल चार खेळाडू उपांत्य फेरीत खेळतील. 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील. अंतिम सामना 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल.