नवी दिल्ली -टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतानं आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू पाठवला आहे. ऑलिम्पिकमधून अधिक पदकं जिंकण्याची आशा यंदा भारताला आहे. ज्या खेळाडूंकडून भारताला पदकांची आशा आहे. त्यामध्ये तिरंदाज खेळाडू दीपिका कुमारीचा क्रमांक लागतो. दीपिका कुमारी जगातील नंबर वन तिरंदाज खेळाडू असून पॅरिसमध्ये आयोजित तिरंदाजी विश्वकप स्पर्धेत दीपिकाने तीन सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता.
टोकियो ऑलिम्पिकमध्येही ती पदकाची प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात आहे. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारातील तिरंदाजीच्या जागितक क्रमवारीत सध्या दीपिका अव्वल स्थानी आहे. दीपिका कुमारीने आतापर्यंत आशियाई चँपियनशिप, राष्ट्रकुल खेळ व विश्वचषकात चार सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्यपदके जिंकली आहेत. आता देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याचा तिचा प्रयत्न असेल.
दीपिका कुमारीचा जन्म 13 जून 1994 रोजी झारखंडच्या रांची जिल्ह्यात रातु चट्टी येथे झाला. दीपिकाचे वडील ऑटो रिक्षा चालवत असत. तिने रांची येथून नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे. 2005 मध्ये दीपिकाला अर्जुन आर्चरी अॅकॅडमीमध्ये तिरंदाजीची संधी मिळाली. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा या अर्जुन आर्चरी अॅकॅडमी चालवतात. 2006 मध्ये दीपिका टाटा आर्चरी अॅकॅडमीमध्ये दाखल झाली. 2009 मध्ये प्रथमच तीने कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून सर्वांना आपल्या कौशल्याची जाणीव करुन दिली होती. तेथूनच तिच्या खऱ्या प्रवासाला सुरवात झाली.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात दीपिकाने अतानू दास यांच्याशी लग्न केले. ऑलिम्पिकनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोरोनाव्हायरसमुळे ऑलिम्पिक एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्यानी त्यांनी 2020 मध्ये लग्न उरकले होते. अतानू दास हेही तिरंदाज आहेत. ऑलिम्पिक तिरंदाजीत आतापर्यंत भारताला पदक जिंकता आलेले नाही. त्यामुळेच तिरंदाजीत पदक मिळवण्यासाठी हे ऑलिम्पिक अत्यंत महत्त्वाचे आहे.
हेही वाचा - दीपिका कुमारीने रचला इतिहास, बनली जगातील नंबर वन तिरंदाज