लखनौ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला. इकाना स्टेडियममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल आनंदीबेन पटेल या देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खेळाडूंना रोख बक्षिसांचे चेक दिले.
उत्तर प्रदेश सरकारने सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला 2 कोटी रुपयांचा चेक देत सन्मान केला. तर रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी दीड-दीड कोटी आणि कास्य पदक विजेत्यांना 1-1 कोटी रुपयांचे बक्षिस दिले.
कास्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरूष हॉकी संघातील सर्व खेळाडूंना उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी 1-1 कोटी रुपये दिले. तर टोकियोत सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी 50-50 लाखांचे बक्षिस दिले.
उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्री उपेंद्र तिवारी यांनी सांगितलं की, आज उत्तर प्रदेशसाठी उत्साहाचा दिवस आहे. हा दिवस ऐतिहासिक दिवस असून देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा आज सन्मान केला जात आहे.
आपल्या खेळाडूंनी उत्तर प्रदेशचेच नाही तर संपूर्ण देशाचे नावलौकिक संपूर्ण जगात वाढवले. आम्ही अशा या खेळाडूंचा सन्मान करत आहोत, असे देखील तिवारी म्हणाले. दरम्यान बुधवारी झालेल्या या सन्मान सोहळ्याला इकाना स्टेडियमध्ये जवळपास 10 हजाराहून अधिक नागरिकांनी हजेरी लावली होती.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली. यात भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले. तर महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू रवी कुमार दाहिया यांनी रौप्य पदकाला गवसणी घातली. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि भारतीय हॉकी संघ कास्य पदकाचा विजेते ठरला.
हेही वाचा - पॅरिस ऑलिम्पिकवरून अभिनव बिंद्रा म्हणाला...
हेही वाचा - 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची सत्काराच्या वेळी तब्येत बिघडली