टोकियो - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय पॅराअॅथलिटची दमदार कामगिरी सुरू आहे. विनोद कुमार याने पुरूष थाळीफेकमध्ये कास्य पदक जिंकले होते. भारताचे हे तिसरे पदक होते. मात्र आता हे पदक रद्द करण्यात आले आहे.
ऑर्गनायझर्सनी स्टेटमेंटमध्ये सांगितले, की विनोद कुमार कोणत्या कॅटेगरित येतात, हे निश्चित करण्यात पॅनल अपयशी ठरले आहे. सध्या ते एनपीसी या कॅटेगरीत होते. आता त्यांना सीएनसी (क्लासिफिकेशन नॉट कम्लिटेड) या कॅटेगरीत ठेवण्यात आले आहे.
स्टेटमेंटमध्ये पुढे सांगण्यात आले आहे, की पुरुषांच्या एफ५२ मध्ये विनोद कुमार पात्र ठरु शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा निकाल रद्द करण्यात आला आहे.
एप५२ या कॅटेगरीत मसल्समध्ये समस्या असणे, हालचाल करण्यात बाधा असणे, एखादा अवयव पूर्ण काम न करणे किंवा पायाची लांबी कमी किंवा जास्त असणे आदी खेळाडूंचा समावेश होतो.
विनोद कुमार 19.91 मीटर लांब थाळी फेकत तिसऱ्या स्थानावर राहिला होता. तर पोलंडचा पीओटर सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. त्याने 20.02 मीटर लांब थाळी फेकली. क्रोएशियाच्या वेलिमीर सॅनडोरने 19.98 मीटर अंतरासह रौप्य पदक जिंकले. दरम्यान, विनोद कुमार एफ 52 कॅटेगरीमधून सहभागी झाला आहे.
टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे पदक होते. याआधी उंच उडीत निषाद कुमारने रौप्य पदक जिंकले आहे. तर त्याआधी टेबल टेनिस खेळाडू भाविनाबेन पटेलने महिला एकेरीत रौप्य पदक जिंकत भारताचे पदकाचे खाते उघडले होते.
पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी कोणती?
भारतीय संघाने पॅराऑलिम्पिकमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी 2016 मध्ये केली होती. रिओमध्ये झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने 4 पदके जिंकली होती. पण टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने एकाच दिवशी तीन पदके जिंकली आहेत. यामुळे या स्पर्धेत भारतीय आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी नोंदवू शकतो.
हेही वाचा - Tokyo Paralympics : रौप्य पदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेलचे राष्ट्रपती कोविंदसह मोदींनी केलं कौतुक
हेही वाचा - Tokyo Paralympics : उंच उडीत निषाद कुमारची कमाल, देशाला जिंकून दिलं दुसरे रौप्य पदक