टोकियो - जगातील अव्वल पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत याने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली. त्याने पुरूष एकेरीच्या ग्रुप ए मधील दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या ओलोक्सांद्रे चिरकोव याचा पराभव केला. भगतसोबत भारताचे इतर बॅडमिंटनपटूंनी चांगली कामगिरी नोंदवली.
गत विश्व चॅम्पियन प्रमोद भगतने चिरकोवचा 26 मिनिटात 21-12, 21-9 असा धुव्वा उडवला. भगत ग्रुप ए मध्ये अव्वल राहत, एसएल 3 वर्गात अंतिम चार मध्ये पोहोचला आहे.
प्रमोद भगत आणि पलक कोहली ही मिश्र दुहेरी जोडी एसएल 3-एसयू 5 गटात उद्या शुक्रवारी सिरीपोंग तेमारोच आणि निदापा सेनसुपा यांच्याविरोधात सामना खेळणार आहेत. भारताचे इतर पॅरा बॅडमिंटनपटू सुहास यतिराज, तरुण ढिल्लो आणि कृष्णा नागर यांनी पुरूष एकेरीत विजयी सुरूवात केली.
सुहास यतिराजने एसएल 4 गटात जर्मनीच्या येन निकलास पोटचा 19 मिनिटात 21-9, 21-3 असा सहज पराभव केला. तर तरूण ढिल्लो याने थायलंडच्या सिरीपोंग तेमारोम याला 23 मिनिटात 21-7, 21-13 ने नमवले.
एसएच 6 गटात कृष्ण नागर याने मलेशियाच्या तारेशॉ दिदीत याचा 22-20, 21-10 ने धुव्वा उडवला. दुसरीकडे महिला गटात, युवा पलक कोहलीला ग्रुप ए महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. तुर्कीच्या जेहरा बगलार याने तिचा 21-12, 21-18 असा पराभव केला.
सुहास यतिराजचा सामना उद्या शुक्रवारी इंडोनेशियाच्या हॅरी सुसांतो आणि फ्रान्सच्या लुकास माजूर याच्याशी होणार आहे. तर तरूण ढिल्लोसमोर कोरियाच्या क्युंग ह्यान आणि इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावान याचे आव्हान आहे.
हेही वाचा - Tokyo Paralympics : भारताला धक्का, स्विमर सुयश जाधव ठरला अपात्र, जाणून घ्या कारण
हेही वाचा - Tokyo Paralympics : राहुल जाखर मिक्स्ड 25 मीटर पिस्तूल इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत