टोकियो - भारतीय पॅरा अॅथलिट टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये नॉकआउट फेरीत (राउंड ऑफ 16) पोहोचली आहे. तिने आज गुरूवारी ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूचा 3-1 ने धुव्वा उडवला.
महिला एकेरी क्लास-4 मध्ये भारताची 34 वर्षीय खेळाडू भाविनाबेन पटेलची लढत ग्रेट ब्रिटनच्या मेगान शॅकलटन हिच्याशी झाली. या सामन्यात भाविनाबेन पटेल हिने 3-1 ने बाजी मारली. 41 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात भाविनाबेन पटेलने मेगानचा 11-7, 9-11, 17-15, 13-11 असा पराभव केला. दरम्यान, जागतिक क्रमवारीत 12व्या स्थानी असलेल्या भाविनाबेन पटेलसाठी हा सामना 'करो या मरो' स्थितीतील होता.
भाविनाबेनने पहिला गेम अवघ्या 8 मिनिटात जिंकला. तेव्हा मेगानने दुसऱ्या गेममध्ये शानदार वापसी केली आणि तिने हा गेम 11-9 अशा फरकाने जिंकत बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ केला. दोघांत कडवी झुंज पाहायला मिळाली. यात भाविनाबेनने 17-15 अशी बाजी मारली. यानंतर पुढील गेममध्ये हीच लय कायम राखत भाविनाबेनने गेमसह सामना जिंकला.
दरम्यान, भाबिनाबेन टोकियो पॅराऑलिम्पिकच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाली होती. तिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली चीनची खेळाडू हाउ यिंग हिने 3-0 ने पराभूत केले होते. यामुळे तिला मेगानविरुद्धचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार होता. यात तिने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान राखले. भाविनाबेन दोन सामन्यात 3 गुण मिळवत नॉकआउट फेरीसाठी पात्र ठरली.
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या रेल्वेच्या महिला हॉकीपटूंचा मध्य रेल्वेकडून सत्कार
हेही वाचा - विराट कोहलीचा मैदानाबाहेर स्वभाव कसा आहे?, न्यूझीलंडच्या गोलंदाजानं सांगितलं