टोकियो - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये आज रविवारी भारताने दुसरे पदक जिंकले. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने सकाळी रौप्य पदक जिंकले. यानंतर आता उंच उडीत अॅथलिट निषाद कुमार याने रौप्य पदकाला गवसणी घातली.
निषाद कुमारने 2.06 मीटर उंच उडी मारत रौप्य पदक जिंकले. त्याने या कामगिरीसर वैयक्तिक विक्रमाशी बरोबरी साधली. निषाद कुमार याने पदकावर नाव करण्यासोबत आशियाई रेकॉर्ड नोंदवला आहे. निषाद कुमारच्या या रुपेरी कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. यात ते म्हणाले की, टोकियोहून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. निषाद कुमार याने उंच उडीत भारतासाठी रौप्य पदक जिंकले, हे पाहून खूप आनंद झाला. ते एक चांगला अॅथलिट आहे. त्याचे अभिनंदन.
दुसरीकडे राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने, देशाच्या नावे आणखी एक पदक आले. निषाद कुमारच्या या कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन. त्याने देशाचे नाव उज्वल केले. सर्व देशवासियांना त्याचा अभिमान वाटत आहे.
भाविनाबेन पटेलची रुपेरी कामगिरी -
टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने इतिहास रचला. तिने महिला एकेरी क्लास 4 मध्ये रौप्य पदक जिंकले. भारताचे टोकियो पॅराऑलिम्पिकमधील हे पहिले पदक आहे. भाविनाबेन पटेलच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केलं.
हेही वाचा - Tokyo Olympics : रौप्य पदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेलचे राष्ट्रपती कोविंदसह मोदींनी केलं कौतुक
हेही वाचा - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत मोठी अपडेट