टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांची सुमार कामगिरी सुरूच आहे. मनु भाकर आणि राही सरनोबत महिला 25 मीटर पिस्तूल स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यास अपयशी ठरल्या आहेत.
काल गुरूवारी मनु भाकर प्रिसिजन फेरीत 292 गुणांसह पाचव्या स्थानावर होती. आज रॅपिड फेरीत ती एकूण 582 गुणांसह 15 व्या स्थानावर घसरली.
राही सरनोबतने प्रिसीजन फेरीत 287 आणि रॅपिड फेरीत 286 गुण घेतले. ती 573 गुणांसह 32 व्या स्थानावर राहिली.
बुल्गेरियाच्या अंतोआनेता कोस्तादिनोवा ही 590 गुणांसह पहिल्या स्थानावर राहिली. तर चीनची खेळाडू 587 गुणांसह दुसऱ्या आणि रशिया ऑलिम्पिक समितीची खेळाडू 586 गुणासंह तिसऱ्या स्थानावर राहिली. दरम्यान, टॉप 8 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
भारताच्या 15 नेमबाजांपैकी आतापर्यंत सौरभ चौधरी (10 मीटर एअर पिस्तूल) अंतिम फेरीत जागा मिळवू शकला आहे. तो पात्रता फेरीत अव्वल स्थानावर तर अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिला.
आता 50 मीटर रायफल थ्री पोजिशन्समध्ये भारताचे आव्हान आहे. यात महिलामध्ये अंजुन मोदगिल आणि तेजस्विनी सावंत तर पुरूषांमध्ये संजिव राजपूत आणि ऐश्वर्य प्रताव सिंह तोमर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
हेही वाचा - Tokyo Olympics: दमदार पुनरागमन! भारतीय महिला हॉकी संघाचा आयर्लंडवर विजय
हेही वाचा - Tokyo Olympic : शाब्बाश पोरी! लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत; भारताचे पदक पक्के