टोकियो - भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं. त्याने 65 किलो वजनी गटात कझाकिस्तानचा कुस्तीपटू दौलत नियाझबीकोव याचा पराभव करत पदकाला गवसणी घातली. बजरंगने हा सामना 8-0 असा एकतर्फा जिंकला. दरम्यान, भारताचे हे सहावे पदक आहे.
बजरंग पुनियाने कास्य पदकासाठीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या कुस्तीपटूवर संपूर्ण वर्चस्व मिळवले. त्याने कझाकिस्तानच्या कुस्तीपटूला एकही गुण घेऊ दिला नाही. त्याने पहिल्या सत्रात दोन वेळा एक-एक गुणाची कमाई करत 2-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर त्याने दुसऱ्या सत्रात 2, 2, 2 असे एकपाठोपाठ गुण घेत कझाकिस्तानच्या खेळाडूला 8-0 ने धूळ चारत कास्य पदक जिंकले.
भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील सहावे पदक
मीराबाई चानूने वेटलिंफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले होते. यानंतर पी. व्ही. सिंधू, लवलिना बोर्गोहेन आणि भारतीय पुरूष हॉकी संघाने कास्य पदक जिंकलं. तर रवी कुमार दहियाने रौप्य पदकाची कमाई केली. आता बजरंग पुनियाने कास्य पदकाची यात भर घातली.
बजरंगची सुवर्ण पदकाची वाट अजरबैजानच्या कुस्तीपटूने रोखली
अजरबैजानचा कुस्तीपटू हाजी अलीयेव याने उपांत्य सामन्यात संपूर्ण वर्चस्व राखलं. त्याने पहिल्या सत्रात दोन वेळा 2-2 गुण घेत सामन्यात 4-1 ने आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात त्याने अधिक ताकतीने खेळ केला. त्याने बजरंगला पुनरागमनाची संधीच दिलीच नाही. त्याने 2, 2, 1, 2, 1 असे गुण घेतले. तर बजरंगला 2, 2 गुण घेता आले. बजरंगचा या सामन्यात 12-5 असा एकतर्फा पराभव झाला होता.
दरम्यान, अजरबैजानचा कुस्तीपटू हाजी अलीयेव अंतिम फेरीत पोहोचल्याने बजरंगला रेपेचाज राउंडमधून कास्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळाली.
बजरंग पुनियाची कारकीर्द
बजरंग पुनिया हरियाणाच्या झज्जर येथील रहिवाशी आहे. 2013 आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने कास्य पदक जिंकलं होतं. यानंतर तो 2013 विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये कास्य पदकाचा विजेता ठरला. याशिवाय 2014 ग्लासको राष्ट्रकुलमध्ये त्याने रौप्य पदक जिंकले होते. बजरंग पुनियाने वर्ष 2014 मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं आहे. तर 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
2019 मध्ये खेलरत्न पुरस्कार -
2015 साली बजरंग पुनियाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 2019 मध्ये त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला. तसेच 2019 मध्ये त्याला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2020 मध्ये फिक्की इंडियन खेल पुरस्काराचा देखील तो मानकरी ठरला.
हेही वाचा - Tokyo Olympics: सुवर्ण पदकाच्या शर्यतीत नीरज चोप्रासमोर 'या' 5 दिग्गजांचे आव्हान
हेही वाचा - रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहियासाठी हरियाणा सरकारची अनोखी घोषणा