टोकियो - ऑलिम्पिकला क्रीडा क्षेत्रातील महाकुंभ म्हटलं जातं. जगभरातील टॉपचे खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. प्रत्येक खेळाडूचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न असते. अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. परंतु, ऑलिम्पिकसाठी पात्र ठरून देखील ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्याचा निर्णय दोन खेळाडूंनी घेतला.
नेमक काय आहे प्रकरण जाणून घेऊयात...
टोकियो ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी सूडानचा ज्यूडो खेळाडू मोहम्मद अब्दुल रसूलचा सामना इस्त्राइलचा ज्यूडो खेळाडू तोहार बुटबुल याच्याशी होणार होता. परंतु मोहम्मदने तोहार विरुद्ध खेळायला नकार देत ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
मोहम्मदने, तोहारविरुद्ध लढण्यास नकार का दिला?
आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्त्राइल आणि पॅलेस्टाईन देशात वाद सुरु आहे. या वादामुळे मोहम्मदने हा निर्णय घेतला आहे. इस्त्राइल पॅलेस्टाईवर अन्याय करत असल्याची प्रतिक्रिया देत मोहम्मदने ऑलिम्पिकमधून माघार घेतली.
एका आठवड्यात दोन खेळाडूंनी तोहारविरुद्ध लढण्यास दिला नकार
सूडानचा ज्यूडो खेळाडू मोहम्मद अब्दुल रसूलच्या आधी अल्जेरियाचा फेथी नौरीन याने तोहार विरोधातील सामन्यातून नावं मागे घेतले होते. दरम्यान, मोहम्मद आणि फेथी हे दोघे पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत.
नौरीन म्हणाला की, "मी ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. पण माझ्यासाठी पॅलेस्टाईनचा मुद्दा जास्त गंभीर आहे. मी कायमच या मुद्द्याला घेऊन गंभीर आहे. इस्त्राइल करत असलेल्या अत्याचारांचा निषेध म्हणून मी हा निर्णय घेत आहे."
नौरीच्या निर्णयामुळे ऑलिम्पिक समितीने, त्याला घरी पाठवलं. दुसरीकडे तोहारला राउंड ऑफ 16 च्या सामन्यात कॅनडाच्या आर्थर मार्गेलिडनकडून पराभव पत्करावा लागला.
काय आहे इस्त्राइल-पॅलेस्टाईन वाद
1948 पासून इस्त्राइल-पॅलेस्टाईन यांच्यात वाद सुरू आहे. 12 मे 2021 रोजी हा पुन्हा उफाळून आला. यात दोन्ही देशांनी एकमेकांवर रॉकेट आणि हवाई हल्ला केला. यात दोन्ही देशांतील हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या वादात बहुतांश मुस्लीम देश पॅलेस्टाईनच्या समर्थनात आहेत. तर जगातील बलाढ्य राष्ट्रे इस्त्राइलच्या पाठिशी आहेत.
हेही वाचा - Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; डेन्मार्कच्या मियाचा पाडला फडशा
हेही वाचा - Tokyo Olympics : रक्तबंबाळ झाला तरी देखील सतीश कुमार नडला आणि प्रतिस्पर्धीला 'फोडला'