टोकियो - क्रीडा विश्वात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याविषयीचा विचार केला तर डोक्यात सर्वात प्रथम येत क्रिकेट. कारण दोन्ही देशातील क्रिकेटचा सामना हा हाय होल्टेज सामना असतो. पण क्रिकेट व्यतिरिक्त हे दोन देश हॉकीच्या मैदानात देखील एकमेकांना टशन देताना पाहायला मिळाले आहे. पण आज दोन्ही देश एक वेगळ्या खेळात समोरासमोर येणार आहेत. तो खेळ आहे भालाफेक.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत भारताचा नीरज चोप्रा याने 86.65 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरी गाठली आहे. तर पाकिस्तानचा अर्शद नदीम 85.16 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत पोहोचला आहे. पात्रता फेरीत नीरज ग्रुप ए मध्ये पहिल्या स्थानावर तर अर्शद ग्रुप बी मध्ये तिसऱ्या स्थानावर होता.
आज अंतिम सामन्यात भिडणार भारत-पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाची नजर आजच्या अंतिम सामन्यावर असणार आहे. नीरज चोप्रा याच्याकडून भारताला पदकाच्या आपेक्षा आहेत. तसा तो पदकाचा प्रबळ दावेदार देखील आहे. त्याने आशियाई खेळात सुवर्ण पदक जिंकलं आहे. दुसरीकडे अर्शद नदीम पाकिस्तानचा अव्वल भालाफेकपटू आहे. तो आशियाई खेळातील कांस्य पदक विजेता आहे. यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या अर्शदचा आदर्श आहे नीरज
पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिले क्रिकेट खेळत होता. परंतु त्याने अचानक क्रिकेट सोडून अॅथलिट होण्याचा निर्णय घेतला. 2018 आशियाई खेळात कास्य पदक जिंकल्यानंतर नदीम म्हणाला की, त्याने नीरज चोप्रा याला पाहत भालाफेकपटू होण्याचा निर्णय घेतला. आज पाकिस्तानचा हा खेळाडू आपल्या आदर्श खेळाडूविरोधात मैदानात उतरणार आहे.
नीरज, अर्शद शिवाय हा खेळाडू देखील पदकाचा दावेदार
भालाफेकमध्ये नीरज चोप्रा अर्शद नदीम हे पदकाचे दावेदार आहेत. परंतु या दोघांशिवाय जर्मनीचा खेळाडू देखील पदकाच्या शर्यतीत आहे. जर्मनीचा जोहानेस वेटर याने 85.64 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरी गाठली आहे.
हेही वाचा - Tokyo Olympic : भारताला जबर धक्का, बजरंग पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव
हेही वाचा - Tokyo Olympic : पराभवानंतर महिला हॉकी कर्णधार राणी रामपालची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...